Sunday, May 10, 2020

कौस्तुभ फॉल पिको सेंटर



त्या वेळेस आम्ही धारणीला होतो. धारणी हे अमरावती जिल्ह्यातील एक तालुक्याचे ठिकाण आहे. मी पहिलीत  असेन. एके दिवशी मी संध्याकाळी शाळेतून घरी आल्यावर मला दिसले कि माझ्या अत्यंत आवडत्या दगडी पाटीवर पेंटच्या ब्रशने बाबा काहीतरी लिहीत आहेत आणि आई बाजूला बसून ते बघते आहे. मी जवळ जाऊन बघितले तर मला दिसले कि त्यावर पांढऱ्या रंगात लिहिले होते "कौस्तुभ फॉल पिको सेंटर". माझ्या दगडी पाटीवर माझ्या नावाची अशी पाटी बघून मी खूप चिडलो होतो. तर ताईने हसून हसून मला चिडवायला सुरुवात केली होती. माझी पाटी आई बाबांनी मला विचारता वापरली म्हणून तर मला राग आलाच होता पण त्यापेक्षा जास्त राग माझे नाव त्या पाटीवर टाकले होते ह्याचा आला होताकाही वेळाने मला समजले कि आई फॉल पिको करून देण्याचे काम करणार आहे. हि गोष्ट साधारण १९९१-१९९२ च्या सुमारासची आहे. धारणी हे जरी तालुक्याचे ठिकाण असले तरी त्यावेळेस गावाची एकूण वस्ती फक्त काही शेकड्यांमध्ये होती आणि ती पण सलग अशी नव्हती. आम्ही नागपूरला असताना आईने शिवणकामाचे शिक्षण घेतले होते. त्यानंतर घरी शिलाई मशीन पण आले होते. पण नंतर लगेचच बाबांची धारणीला बदली झाली.

माझी आणि ताईची शाळा दुपारची असे. त्यामुळे सकाळी बाबा ऑफिसला, ताई आणि मी शाळेत गेल्यानंतर आईला दुपारी वेळ असायचा. त्यावेळचा उपयोग आणि स्वतःच्या कौशल्याचा उपयोग करण्याचे तिच्या मनात आले. पिकोचे काम हे मशीनवर करता येत असे तर फॉल हाताने लावायला लागत असे. त्यामुळे पिको झटपट होई तर फॉल दोन्ही बाजूनी लावायचा असल्यामुळे बराच वेळ घेई. फॉल सुईने अत्यंत काळजीपूर्वक घालावा लागे. मांडीवर एक पाट घेऊन आई बराच वेळ फॉल लावायचे काम करीत बसे.

हळू हळू आईचे काम वाढले. खरे म्हणजे हे काम ती व्यवसाय म्हणून करत नव्हती. पण आपल्याकडे उपलब्ध असणाऱ्या वेळेचा काही सदुपयोग व्हावा ह्यासाठी करत होती. घर सांभाळूनच आपण हे काम करायचे असे तिने ठरवले होते. त्यामुळे त्या अनुशंगानेच तिने कामाच्या व्याप वाढवला. इतक्या लहान गावात असा कितीसा व्यवसाय होणार. आम्ही धारणीला जवळपास तीन वर्ष होतो. तेव्हढ्या वेळात तिने आपल्या छोट्याश्या व्यवसायातून तीन  हजार रुपयाचा नफा कमावला. ह्यातून तिने स्वतःसाठी काहीही घेतले नाही. बाबाना मात्र तिने आपल्या उत्पन्नातून टायटनचे एक छानसे घड्याळ घेतले. धारणींहून बाबांची बदली अमरावतीला झाली. ह्यावेळपर्यंत माझा आणि ताईचा अभ्यास वाढल्यामुळे आईने तिचा छोटासा व्यवसाय बंद केला. तर अशी ही माझ्या नावाच्या एका छोट्याश्या व्यवसायाची छोटीशी कथा.

आजच्या जगात उद्यमशीलतेला एव्हढं महत्व आलेलं असताना माझ्या आईने सुमारे तीस वर्षांपूर्वीच स्वतः:चे स्टार्टअप सुरु केले होतेपरंतु आपल्या घराला आणि मुलांना आपली जास्ती गरज आहे हे ओळखून तिने आपला व्यवसाय जास्ती पुढे वाढवला नाही. एव्हढ्या कष्टाने सुरु केलेला व्यवसाय तिने बंद केला. कदाचित आईने व्यवसाय सुरु ठेवला असता तर तो ती अजून मोठा करू शकली असती. कदाचित आज माझ्या नावाने सुरु झालेल्या त्या व्यवसायाचा मला खूप अभिमान वाटला असता. परंतु घरातील जबाबदारी तिला ह्यापेक्षा जास्त महत्वाची वाटली. 

लहानपणी शाळेच्या फॉर्मवर आईच्या व्यवसायाच्या जागेवर गृहिणी अशी नोंद करता मला कधी कधी वाटायचे कि ती पण जर नोकरी करणारी असती तर किती छान झाले असते. कारण गृहिणी असे लिहिण्यात मला काही चांगले वाटत नसे. परंतु जसा जसा मी अजून मोठा होत गेलो त्यावेळी लक्षात आले कि घरात नीट लक्ष देणे म्हणजे काही साधे काम नाही. मुळात जर नीट लक्षात घेतले तर व्यवस्थापनातल्या बऱ्याच संकल्पना घरात गृहिणी वापरत असतात.

उदाहरणार्थ मी काही दाखले खाली देतो आहे. ह्यापेक्षा कितीतरी अधिक असे दाखले देता येतील.

१. रिऑर्डर लेव्हल हि ऑपरेशन्स व्यवस्थापनातील संकल्पना स्वयंपाकगृहातील सामान किंवा किराणा मागण्यासाठी वापरणे, किंवा काही वेळेस काही विशिष्ट वस्तू गरज असेल त्या वेळेस अँड आवश्यक त्या प्रमाणात मागवणे जे कि ऑपरेशन्सचे व्यवस्थापनातील जस्ट इन टाइमचे तत्व आहे.

२. वर्षानुवर्षे गृहिणी स्वयंपाकघरात वरण, भाजी, पोळ्या करताना त्यांची चव, पोळ्यांचा आकार हा जवळपास रोज एकसारखा असतो म्हणजेच सिक्स सिग्मा किंवा टोटल क्वालिटी मॅनेजमेंट चे तत्व.

३. घरातील प्रत्येक वस्तू हि तिच्या ठरलेल्या जागीच ठेवणे म्हणजे लिन मॅन्युफॅक्चरिंग चे तत्व.

४. घरात येणाऱ्या पैशांचे मॅनेजमेंट ह्यामध्ये घरगुती कामांचा प्राधान्यक्रम ठरवणे आणि त्यानुसार कामे करणे म्हणजेच फायनान्शियल मॅनेजमेंट करणे.

५. घरातील प्रत्येक माणसाला त्याच्या कुवतीनुसार कामाचे वाटप करणे आणि ते काम त्याच्याकडून करवून घेणे म्हणजे मनुष्यबळ विकास व्यवस्थापन करणे.

6. उन्हाळ्याची कामे, दिवाळीची कामे, हिवाळ्यातील कामांची योजना, आखणी, प्रत्यक्ष ती कामे करणे आणि ठरलेल्या दिवशी ती पूर्ण करणे म्हणजेच प्लॅन-डू-चेक-ऍक्ट चे तत्व आणि प्रकल्प व्यवस्थापनातील सर्व सूत्रे वापरणे.

गृहिणींना हि सर्व तत्व नक्कीच माहित नसतील परंतु सर्व घर त्या लीलया सांभाळू शकतात कारण आपल्या घरावर आणि आपल्या घरातील लोकांवर त्यांचे असलेले निस्सीम प्रेम आणि त्यांच्या सुखासाठी वाटेल तेव्हढे कष्ट करण्याची त्यांची तयारी. 

Tuesday, March 10, 2020

प्रमोशन


 “अभिनंदन अविनाश !. तुझ्या उत्कृष्ठ कामगिरीबद्दल कंपनी तुला प्रमोशन देते आहे. तुझी निवड हि खास आपल्या चीफ एक्सेक्युटीव्ह ऑफिसर तर्फ़े करण्या आलेली आहे. या प्रमोशन नंतर तुला आपल्या कंपनीतर्फे संपूर्ण युरोप विभागाची जबाबदारी देण्यात येणार आहे. पुढच्या एका वर्षात कंपनीचा या विभागातील नफा तीस टक्क्याने वाढविण्याचे आव्हान तुझ्यासमोर असेल. तुझ्या सारखा अत्यंत हुशार, तरुण, तडफदार, कर्तबगार अधिकारीच हे आव्हान यशस्वीपणे पेलू शकतो ह्याची कंपनीला जाणीव आहे आणि म्हणूनच तुझ्या नावावर या प्रमोशन साठी शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. अविनाशच्या बॉसने त्याला हि बातमी त्याला आपल्या कॅबिनमध्ये बोलावून दिली.  

हि बातमी ऐकताच अविनाशच्या चेहऱ्यावर हसू उमलले. आपल्या कर्तृत्वाची योग्य दखल कंपनीने घेतली याबद्दल त्याला प्रचंड अभिमान वाटला. तो म्हणाला, “धन्यवाद सर ! कंपनीच्या अपेक्षांवर मी नक्की खरा उतरीन अशी मला खात्री आहे.

"गुड गुड माय बॉय !" असे म्हणून बॉस पुढे बोलले. आता या प्रमोशन नंतर तुला मागे वळून पाहायची गरजच नाही. या पोस्टसाठी तुला जवळपास प्रत्येक शनिवार, रविवार भारतात आणि यूरोपमध्ये दौरे करावे लागतील, मोठमोठ्या क्लाएंट्स बरोबर पार्टी, बिझनेस मिटींग्स, सेमिनार्स ह्यामध्ये तुझे सगळे वीकेंड्स आता खूप बिझी राहतील. याबरोबर तुला जग फिरायला मिळेल ते वेगळेच. सो आय विश यु ऑल द बेस्ट !

शनिवारी सकाळची हि अविनाशची त्याच्या बॉस सोबत नेहमीची मीटिंग होती. तसे त्याचे ऑफिस सोमवार ते शुक्रवार पर्यंत असायचे. परंतु त्याच्या वाढलेल्या जबाबदारीमुळे तो शनिवार अर्धा दिवस ऑफिसमध्येच राहायचा. मीटिंग संपल्याबरोबर त्याने आईला फोन केला आणि बोलला "आई माझे प्रमोशन झाले! सांग बाबांना कि अविनाशने प्रमोशन मिळवले आणि स्वीकारलेदेखील.त्याच्या बोलण्यातील कडवटपणा त्याच्या आईला लगेच जाणवला. परंतु त्याच्या आईने त्याचे मनःपूर्वक अभिनंदन केले आणि हि आनंदाची बातमी मी लगेच बाबाना कळवते असे ती बोलली.

अविनाशचे वडील एका मोठ्या बँकेत अधिकारी होते. सोमवार ते शुक्रवार ते सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत कार्यालयात असायचे. शनिवारी अर्धा दिवस कार्यालयाची वेळ होती पण त्याच्या वडिलांना तरी बऱ्याच उशिरापर्यंत काम असायचे. शनिवारी संध्याकाळी उशिरा बाबा घरी आले कि ते अविनाश आणि त्याच्या मोठ्या बहिणीला फिरायला घेऊन जायचे. कधी कधी पूर्ण कुटुंब बाहेरच जेवायचे. शनिवारचा तो उरलेला दिवस आणि रविवार पूर्ण दिवस मात्र त्याचे बाबा आपल्या कुटुंबाबरोबरच जास्तीत जास्त घालवायचे.

अविनाश त्यावेळी साधारण पंधरा वर्षांचा असेल आणि त्यावेळेस घरात फक्त बाबांच्या प्रमोशनच्याच गोष्टी होत होत्या. त्याने आईला फोनवर बोलताना ऐकले कि आता बाबांचे प्रमोशन होणार, ते अजून मोठ्या पदावर जाणार, त्यांचा पगार भरपूर वाढणार. आता पुढे अविनाशला आणि त्याच्या ताईला  शिक्षणासाठी खूप पैसा लागेल तो आता या प्रमोशन मुळे मिळेल.

एकूणच बाबांचे प्रमोशन झाल्यावर जास्त मजा होणार होती म्हणून तो खूप उत्सुकतेने बाबांच्या प्रमोशनची वाट बघत होता. पण काही दिवसांनी अचानक घरात बाबांच्या प्रमोशनच्या गोष्टी बोलणे बंद झाले. एक दिवशी  आई शेजारच्या काकुंशी बोलताना त्याने ऐकले कि बाबांनी स्वतःहून प्रमोशन नाकारले. अविनाशला हे ऐकून खूप वाईट वाटले. बाबानी प्रमोशन का नाकारले हे काही त्याला कळले नाही.

अविनाशच्या बहिणीने बीएससी, एमएससी केले आणि स्पर्धा परीक्षा देऊन ती पण एका बँकेत नोकरीला लागली. अविनाशपण अत्यंत कामसू, हुशार, कर्तबगार होता. त्याला त्याच्या गुणवत्तेच्या बळावर अभियांत्रिकीसाठी महाराष्ट्रातील सर्वोत्तम विद्यालयात मध्ये प्रवेश मिळाला असता. परंतु ते विद्यालय दुसऱ्या मोठ्या शहरात होते आणि आपल्याला तो खर्च परवडणार नाही असे त्याच्या बाबांनी त्याला स्पष्ट सांगितले होते. त्यामुळे अविनाशला त्याच्या मनाला मुरड घालून त्याच्या शहरातील विद्यालयात प्रवेश घ्यावा लागला. पण हि गोष्ट त्याच्या मनाला फार लागली होती.  आपल्या बाबांनी जर प्रमोशन घेतले असते तर पाहिजे आपल्याला त्या विद्यालयात प्रवेश घेता आला असता आणि त्यामुळे आपल्या प्रगतीची सर्व दारे खुली झाली असती हे त्याला स्पष्ट जाणवत होते. त्यामुळे आपल्या प्रगतीच्या आड बाबांचे प्रमोशन न घेणे हेच कारण होणार होते. त्या दिवसापासून त्याला त्याच्या बाबांच्या प्रमोशन न घेण्याची चीड आलेली होती. जेव्हापण त्याच्या अभियांत्रिकी प्रवेशाचा विषय निघायचा तो आई बाबांसमोर हे बोलून दाखवायचा. त्याचे आई बाबा मात्र यावर काहीच बोलायचे नाहीत. 

अभियांत्रिकीनंतर त्याने काळाची पावलं ओळखून व्यवस्थापनातील पदवी घेतली. खरेतर त्याला अमेरिकेतून हि पदवी मिळवायची होती. परंतु घरून त्यासाठी आवश्यक तेव्हढे आर्थिक पाठबळ नव्हते. त्यामुळे त्याला भारतातूनच हि पदवी मिळवावी लागली. बाबांचे प्रमोशन न घेणे पुन्हा एकदा त्याच्या प्रगतीच्या आड आलेले होते. आणि त्याचबरोबर त्याची त्याबद्दलची चीड पण वाढलेली होती.

शिक्षणानंतर त्याला नोकरी मिळाली. नोकरीच्या पहिल्याच दिवशी त्याने मनाशी ठरवले होते, कि जी चूक बाबांनी केली ती आपण नाही करायची. आपल्याला कितीही कामाचे कष्ट पडले तरीही सगळे प्रमोशन घायचे. आपल्याला जो त्रास झाला तो आपल्या मुलांना होऊ द्यायचा नाही.

नोकरीवर रुजू झाल्यानंतर आपल्या बुद्धिमत्तेच्या आणि उत्कृष्ठ कामगिरीच्या जोरावर अविनाशने या कंपनीत एका वरिष्ठ पदापर्यंत मजल मारली होती. त्याची बायको सोनाली हिसुद्धा उच्चशिक्षित होती परंतु ती घरातच रमली होती. त्यांच्या संसारवेलीवर अर्णव आणि अनुष्का अशी दोन फुले उमलली होती. अर्णव पाच वर्षांचा होता तर अनुष्का दोन वर्षांची होती.

सोमवार ते शुक्रवार अविनाश आपल्या कामाच्या व्यापात पूर्णपणे गढून गेलेला असायचा. शनिवार संध्याकाळ नंतर मात्र अविनाश पूर्णपणे घरात रमून जायचा. शनिवारी संध्याकाळी घरी आल्याबरोबर अर्णव बॅट बॉल घेऊन यायचा. त्यानंतर दोघे बापलेक घर दणाणून सोडायचे. अविनाश नेहमी पहिल्याच बॉलला आऊट व्हायचा आणि नंतर पूर्ण वेळ अर्णव बॅटिंग करायचा. लहानगी अनुष्का सोनालीच्या कडेवर बसून हसत खिदळत सगळी गम्मत बघत रहायची. शनिवारी संध्याकाळी सोनाली अविनाशच्या आवडीचा एखादा पदार्थ बनवायची. रात्री जेवताना मग दोघे हा आठवडा कसा गेला, अनुष्काने काय गम्मत केली अर्णवने काय धमाल केली ह्याच्या चर्चा करत बसायचे आणि जोडीला मस्त गरम कॉफी असायची. रविवार सकाळी मग सगळे मस्त दूरवर फिरून यायचे. संध्याकाळी एखादा चित्रपट घरीच बघायचे. रविवार संध्याकाळचे जेवण अविनाश बनवायचा. खरेतर आठवड्यातील सर्व दिवसांपैकी आपल्या कुटुंबाबरोबर मिळणार हा वेळा अविनाशला त्याच्या कामासाठी आवश्यक असणारी सर्व ऊर्जा देऊन जायचा.

आज तो खुशीतच घरी आला. सोनालीने दार उघडल्याबरोबर लहानग्या अर्णव आणि अनुष्काने त्याला बघून प्रचंड दंगा घातला. अविनाशने पटकन दोघांनापण कडेवर घेतले. सोनाली हा सर्व सोहळा कौतुकाने बघत होती. अविनाशने मग तिला आपल्या प्रमोशनची बातमी सांगितली. सोनालीला खूप आनंद झाला. तिच्या नवऱ्याने खरोखरच आपल्या कष्टांच्या बळावर हे प्रमोशन मिळवले होते. दुसरा दिवस रविवारचा होता.

त्या रविवारी मात्र अविनाशला पहाटे फारच लवकर जाग आली. खरे तर त्याला रात्री नीट झोपच लागलेली नव्हती. तो एकटाच बाहेर दिवाणखान्यात आला. काल रात्री त्याला पहिल्यांदाच जाणवले कि मुलं फार लौकर मोठी झाली आहेत. इतके वर्ष आपल्या कामात प्रचंड गुंतलेले असताना, आपल्या पिलांना आपण मोठा होताना नीट अनुभवलेलेच नाही. अर्णवचं बोबडे बोल, त्याचे रांगणे, काऊचिऊचा घास खाणे, त्याच्या रोजच्या गंमती जंमती, अनुष्काचे हसणे खिदळणे, बाबाच्या कडेवर येण्यासाठी चाललेली धडपड हे सगळे सगळे आपण जगायचे राहून गेलो आहे हे विचार त्याला फारच त्रास देऊ लागले.

या प्रमोशननंतर आपण कितीतरी वीकएंड घराबाहेर राहणार, म्हणजे हा थोडा वेळसुद्धा आपण आपल्या चिमण्यांसोबत घालवू शकणार नाही हि कल्पनाच त्याला सहन होईनाशी झाली. कामाच्या मागे लागताना आपल्यालातला बाप मात्र फार मागे राहून गेला हि जाणीव त्याला खूप अस्वस्थ करून गेली.

त्याच्याही नकळत त्याच्या डोळ्यातील अश्रूंनी बाहेर धाव घेतली होती. त्याला एकदम गदगदून आले. एव्हढ्यात त्याच्या पाठीवर हळुवार हात फिरला. त्याने चमकून मागे बघितले सोनाली भरल्या डोळ्यांनी त्याच्याकडे बघत होती. एका बापाच्या भावना एका आईने न सांगता ओळखल्या होत्या.

 तो तिला म्हणाला, "सोनाली, मी हे प्रमोशन नाही घेऊ शकणार !". सोनालीने त्याला पुढे बोलूच दिले नाही. ती म्हणाली, "अविनाश, काल मला जेव्हढा आनंद झाला होता, त्यापेक्षा जास्त तुझा अभिमान आत्ता वाटतो आहे. मला नेहमी वाटायचे कि कामाच्या ओघात तुझ्यातला बाप त्याचे अस्तित्व तर विसरणार नाही ना. मुलांच्या वाढत्या वयात, आई-बाप हे नेहमीच त्यांच्या सोबत हवेत. मग त्यासाठी कधी कधी आई-बाबांना त्यांचे ध्येय मागे ठेवावे लागले तरीही. मला खात्री होती कि तुलादेखील कधीतरी याची जाणीव नक्की होईल."
अविनाश कौतुकाने सोनालीकडे बघत राहीला. आता त्याच्या मनातले बाबांवरील रागाचे धुके विरून गेले होते. आपल्या बाबानी प्रमोशन का नाकारले हे त्याला आज लक्षात आले होते.

सोमवारी अविनाशने आपल्या बॉसला  प्रमोशनसाठी आपला नकार कळवला आणि त्याच रात्री तो आपल्या कुटुंबासह आपल्या आई वडिलांकडे आला. त्याला अचानक आलेला पाहून आई बाबाना आनंद झाला. घरात आल्याआल्या अविनाशने पटकन बाबाना मिठी मारली आणि दाटून आलेल्या आवाजात तो बोलला, "बाबा !, मी माझे प्रमोशन नाकारले आहे. तुम्ही तुमचे प्रमोशन का नाकारले, हे मला आत्ता कळले. मी तुमच्यावर यासाठी रागावलो होतो, तुम्हाला याबद्दल खूप वेळा बोललो यासाठी मला क्षमा करा."

बाबांनी त्याची पाठ थोपटून त्याला शांत केले आणि आईकडे वळून ते म्हणाले, "बघ, मी तुला त्यादिवशी म्हंटले होते ना कि आज जरी मी हे प्रमोशन नाकारले आहे, तरीही काही वर्षांनंतर मला एक प्रमोशन नक्की मिळेल म्हणून. आज मला ते प्रमोशन मिळाले आहे.


या  लेखातील शब्दांकन कॉपीराईट (© कौस्तुभ प्रकाश भागवत)  आहे.

All Rights Reserved, 2020 © कौस्तुभ प्रकाश भागवत. 

Sunday, February 16, 2020

माझे आजोळ


आजोळचे कौतुक नसेल असा मनुष्य सापडणे कठीणच आहे. विशेषतः लहान मुलांचे आणि आजी आजोबांचे नाते हे अत्यंत वेगळे असे नाते आहे. ही नाती खरेतर शब्दातून मांडणं अवघड आहे. परंतु तरीही लिहिण्याची इच्छा झाली म्हणून हे धाडस करून बघतो आहे.

माझे आजोळ अमरावतीचे. अमरावतीच्या राजापेठ चौकात बडनेरा रोड वर माझ्या आजी आजोबांचे घर होते. हे घर मुंबई कलकत्ता हायवे ह्या अत्यंत रहदारीच्या रस्त्यावर होते. आजोबांचे घर हे पहिल्या मजल्यावर होते आणि खालती बरीच दुकाने होती. घराला समोरची आणि मागची अश्या दोन गच्या होत्या. मागची गच्ची बरीच मोठी होती. ह्या गच्चीमध्ये वापरण्याच्या पाण्याकरिता एक मोठे टाके बांधले होते. कॉरपोरेशनचा नळ खाली होता. ह्या नळाचे पाणी वरच्या टाक्यात चढवण्यासाठी टिल्लू पंप लावण्याची सोय केली होती. आम्ही आजोळी गेल्यावर हे पाणी चढवणे हे माझ्या व माझ्या मोठ्या बहिणीसाठी एक महत्वाचे काम असे. कॉरपोरेशनच्या नळाच्या खाली एक मोठी बादली मावेल एव्हढे टाके होते. त्यात ती बादली ठेवायची आणि बादली भरली कि टिल्लू पंपाचा पाईप त्यात सोडायचा आणि पाणी चढवणे सुरु करायचे. बादलीतले पाणी संपत आले कि पंप बंद करायचा. कधीतरी बादलीतले पाणी प्रमाणापेक्षा कमी झाले तर त्या पाइपमध्ये हवा शिरायची आणि मग ती हवा काढणे हि एक निराळीच कसरत होऊन जायची. अमरावतीला पाण्याचे तसे दुर्भिक्ष. त्यामुळे नळाच्या पाण्याला फार जोर नसे. त्यामुळे हे पाणी चढवण्याचे काम साधारण एक दिड तास चालायचे. वरचे टाके पाण्याने पूर्ण भरले म्हणजे आजोबा निरोप पाठवायचे कि आता पुरे. मी तर प्राण कंठाशी आणून ह्या निरोपाची वाट बघत असे.

माझे आजोबा कै. एकनाथ नारायण भागवत हे शिक्षक होते आणि ते डीएड कॉलेजला शिकवत असत. रिटायर झाल्यानंतर ते घरी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र अणि गणित ह्या विषयांच्या शिकवण्या घेत. माझे आजोबा हे अत्यंत प्रेमळ होते. आम्ही आजोबांच्या घरी आलो कि त्याच दिवशी ते मला व माझ्या बहिणीला शुद्धलेखनाची वही आणि पेन घेऊन द्यायचे आणि मला व बहिणीला दररोज प्रत्येकी दहा ओळी शुद्धलेखन लिहायला सांगायचे. मला ह्या गोष्टीचा अत्यंत कंटाळा येत असे. मग मी पेपरात छापून येणाऱ्या कॉमिक स्ट्रीप मधून पाच ते दहा वाक्य कशीबशी लिहीत असे. माझी बहीण मात्र नेमाने शुद्धलेखन लिहीत असे. माझा शुद्धलेखनातला कंटाळा बघून ते मला रागावत असत परंतु माझी सवय काही बदलली नाही. लहानपणी आजोबांच्या ह्या कृतीचे महत्व मला कधीच लक्षात आले नाही आणि त्याचे दुष्परिणाम मी नंतर माझे संपूर्ण शिक्षण पूर्ण होईपर्यंत भोगले. माझ्या वडिलांचे हस्ताक्षर अत्यंत नीटनेटके आणि सुवाच्य होते. पण मी मात्र ह्या बाबतीत माझ्या वडिलांचा कित्ता गिरवू शकलो नाही. माझे स्वतःचे अक्षर मलाच वाचता येईल कि नाही एव्हढे खराब असे. त्यामुळे माझ्या परीक्षांमध्ये बराच अभ्यास करून सुद्धा मला तुलनेने कमी मार्क्स मिळायचे.

आम्ही आजोबांकडे गेलो म्हणजे ते आम्हाला रोज रात्री गोष्टी सांगत असत. रात्री गाद्या घातल्या कि मग पलंगावर आजोबा झोपायचे. मग त्यांच्या एका हातावर मी आणि दुसऱ्या हातावर माझी बहीण असे आम्ही डोके ठेवून झोपायचो आणि त्यांचे गोष्ट सांगणे सुरु व्हायचे. गोष्ट सांगताना त्यांचे डोके हे वर छताकडेच हवे ह्याबद्दल आम्ही फार जागरूक राहायचो. बोलता बोलता चुकून जर त्यांनी माझ्याकडे वळून पुढचे बोलायला सुरुवात केली कि माझी बहीण ओरडायला लागायची कि आजोबा तुम्ही फक्त त्याला गोष्ट सांगताय. हेच जर बोलता बोलता ते तिच्या कडे वळले तर मी ओरडायचो. त्यामुळे आमची भांडणे न होऊ देता गोष्ट सांगण्याची कसरत त्यांना करावी लागायची.

माझ्या आजोबांच्या काही खास लकबी होत्या. त्यांच्यासमोर एखादे मूल तोंडात बोट घालताना दिसले म्हणजे ते "तोंडात बोट" असे एक वाक्य म्हणत असत आणि ती सवय सोडवण्याचा प्रयत्न करत असत. कधीतरी आजोबा चालताना आपले हात आपल्या पायांवर विशिष्ठ क्रमाने थाप मारून चालत असत आणि त्याचा एक विशिष्ट ठेका निर्माण होई. तो ठेका मला आवडत असल्यामुळे मी देखील त्याप्रमाणे चालण्याचा प्रयत्न करून पाहत असे.

आजोबांच्या घरी एक छोटी कोठीची खोली होती. त्या खोलीमध्ये एका पोत्यात आजोबा जुनी पत्रे ठेवत असत. हे पोते म्हणजे आम्हा मुलांसाठी खेळण्याचे एक वेगळेच साधन झाले होते. त्या पोत्यात हात घातला म्हणजे आमच्या हाताला कधी एखादे जुने पत्र, कधी जुने पुस्तक, कधी पेन अश्या वस्तू सापडत असत. घरामध्ये भिंतीत फडताळात असलेली आणि बाहेरून लाकडी दार असणारी दोन कपाट होती. त्यापैकी एक मेन हॉल मध्ये तर दुसरे किचन मध्ये होते. मेन हॉल मधील कपाटाला आजोबांचे आणि किचन मधील कपाटाला आजीचे कपाट अशी आम्ही नावे दिली होती.

आजोबांचे कपाट उघडले म्हणजे त्यात आम्हाला हार्डवेअरच्या वस्तू, अनेक जुनी मासिके, ऑडिओ कॅस्सेट्स, तांब्याच्या, इलेकट्रीकच्या वस्तू असे काय काय सामान सापडायचे. ह्या वस्तू उचकटून त्यांच्याशी पण आमचे खेळणे चाले. आमच्या ह्या उपद्व्यापातला एक गमतीशीर प्रकार म्हणजे मी कधी कधी वाटीभर पाण्यात मिळेल तो पदार्थ टाकून जसे कि राखुंडी, तोंडाला लावायची पावडर त्यापासून काहीतरी नवीन प्रकार बनेल अशी अपेक्षा करायचो. आजोबा बऱ्याचदा आम्हाला सायन्स चे काही प्रयोग करून दाखवीत. ह्यामध्ये कंगवा केसांमध्ये फिरवून त्याला कागदाचे तुकडे कसे चिकटतात ते दाखवणे (स्थितिज ऊर्जा), एका भांड्यात पाणी भरून, मेणबत्ती लावून त्यावर ग्लास उपडा ठेवणे आणि मेणबत्तीचे विझणे आणि त्याप्रमाणात पाणी ग्लास मध्ये वरती चढणे(ऑक्सिजनचा प्रयोग), भिंगाद्वारे सूर्यप्रकाशात एखादा कागदाचा कपटा पेटवणे, साखर पाण्यात विरघळवून ते पाणी बशीत काढून आणि उन्हात ठेवून त्यापासून पुन्हा साखर मिळवणे असे प्रयोग असायचे.

आम्ही अमरावतीला आलो म्हणजे आमचे अजून दोन ठरलेले कार्यक्रम असत. एक म्हणजे अमरावती बडनेरा प्यासेंजरची ट्रीप आणि दुसरा म्हणजे मालटेकडीवरची चक्कर. आजोबा आम्हाला घेऊन अमरावती - बडनेरा - अमरावती असे परतीचे तिकीट काढत. आजोबांसोबतची ही सहलपण आमच्यासाठी आनंदाची एक पर्वणीच असायची. ट्रेनमध्ये आजोबा आम्हाला अनेक गोष्टी सांगायचे. मालटेकडी म्हणजे संध्याकाळी फिरायला जाण्याची जागा. फारशी उंच नसेल परंतु वर चढेपर्यंत आम्हाला चांगलीच धाप लागायची. तिथून परत घरी येईपर्यंत आजीने स्वयंपाक केलेला असे. मग त्या दोघांसोबत गप्पा मारत गरम भाकरी, पोळी खात आमचे जेवण चालायचे.

आम्हाला गुंतवून ठेवण्यासाठी आजोबांनी एक खेळ शोधून काढला होता. ते मला आणि ताईला गॅलरीत बसवीत. आम्हाला एक एक पेन आणि कागद देत आणि पुढच्या एक ते दीड तासात घरासमोरच्या रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांची जसे बस, ट्रक, कार, ऑटो, सायकल, सायकलरीक्षा ह्यांची नोंद करायला सांगत. आम्हीदेखील ह्या नोंदी घेऊन खूप उत्साहाने त्यांना त्या दाखवीत असू.

आजोबांच्या झोपायच्या खोलीत एका भिंतीवर पुस्तकांचे एक मोठे कपाट होते. त्यात लहान मुलांच्या गोष्टींपासून तर ऐतिहासिक, वैज्ञानिक अशा पुस्तकांचा साठा होता. आजोबांचा पुस्तक संग्रह प्रचंड होता. साहजिकच त्यामुळे आम्हालापण वाचनाची गोडी निर्माण झाली. याच खोलीत लोखंडाचे फोल्डिंगचे दोन पलंग होते. दुपारी मी आणि माझा चुलत भाऊ आम्ही त्या पलंगाचा बस म्हणून वापर करायचो. स्टीलची मोठी पातेली किंवा जेवण्याचे ताट म्हणजे आमचे स्टिअरिंग व्हील. इंजिनाचा आवाज आम्ही तोंडाने काढायचो. दुपारी किती तरी वेळ आम्ही तोंडाने घ्यांग, घ्यांग, घ्यांग आणि पीप पीप असा मोठ्याने आवाज काढत खेळात असू. दुपारी आजी आजोबांच्या झोपण्याच्या वेळेत आमच्या अश्या खेळण्याचा त्यांना किती त्रास होत असेल ह्याची मी आता कल्पनापण करू शकत नाही. तरीपण ते दोघे कधीही आम्हाला कधीही ओरडले नाहीत.


उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये आम्ही दोघे आणि आमची आतेभावंडं अमरावतीला जमायचो. मला आठवणारी एक गम्मत म्हणजे आमची नाटकं. उन्हाळ्यामध्ये झोपायचे पलंग आमच्या मोठ्या गच्चीत असायचे आणि रात्री आम्ही बाहेरच झोपत असू. ह्या पलंगांना मच्छरदाणी लावण्यासाठी म्हणून चार बाजूनी लोखंडी बार केले होते. हे पलंग म्हणजे आमचा रंगमंच. मच्छरदाणीच्या जागी चादरी टाकून आम्ही रंगमंचाचे पडदे करत असू.

रात्री गच्चीमध्ये झोपण्यात पण वेगळीच गंमत असायची. आम्ही साधारण रात्री ८ च्या सुमारास गाद्या गच्चीत घालून ठेवायचो. झोपण्याच्या वेळेपर्यंत गाद्या एक्दम गार होऊन जायच्या.मग रात्री गादीवर पडल्या पडल्या आकाशातील सप्तर्षी, ध्रुव तारा वगैरे तारे बघत, गप्पा मारता मारता झोपायचो. सकाळी सहा वाजताच लक्ख उजाडले असायचे. त्यामुळे कितीपण प्रयत्न केला तरीही उशिरापर्यंत झोपता येत नसे.

हिवाळ्याच्या सुमारास आम्ही कधी आजोळी असलो म्हणजे बंबाच्या पाण्याने आंघोळ करण्याची मजा यायची. गच्चीत पाणी तापवण्याचा तांब्याचा बंब होता. त्याच्यामध्ये आतमधल्या बाजूने लाकडाच्या झिलप्या टाकत आणि बाहेरच्या बाजूने पाणी ओतत. आजोबा बंब पेटवत असत. थोड्याच वेळात मस्त कढत पाणी मिळे. त्या पाण्याची मजा आजच्या गिझरच्या पाण्याला पण नाही. बंबामधले तापलेले पाणी काढल्यानंतर बंब बराच रिकामा होई. मग त्यात पुन्हा गार पाणी ओतावे लागे. बंब संपूर्ण तांब्याचा असल्याने खूप तापलेला असे आणि आतली लोखंडी झिलप्या टाकण्याची नळी पण प्रचंड तापलेली असे. त्यामुळे नवीन गार पाणी ओतताना एकदम खूप वाफा निघत आणि पाण्याचा झस झस असा आवाज होत असे. त्या आवाजाचीपण एक वेगळीच मजा होती.

या  लेखातील शब्दांकन कॉपीराईट (© कौस्तुभ प्रकाश भागवत)  आहे.

All Rights Reserved, 2020 © कौस्तुभ प्रकाश भागवत  

अनुभवालय


                                                                अनुभवालय

अरुणराव मागच्या वर्षीच सरकारी सेवेतून निवृत्त झाले होते. जवळपास ३० वर्षांची प्रदीर्घ सेवा केल्यानंतर अचानक मिळालेला प्रचंड मोकळा वेळ कसा घालवायचा असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला. परंतु लौकरच त्यांनी आपला मार्ग शोधला. रोज दुपारी चार वाजल्याच्या सुमारास टिळक रस्त्यापासून त्यांची सायंफेरी सुरु व्हायची आणि ती पार फर्ग्युसन विद्यालय रस्ता संपेपर्यंत चालू राहायची. तिथून मग नेहेमीची बस पकडून घरी परत यायचे. अश्याप्रकारे रोजचे सुमारे तीन ते चार तास किंवा काही जास्तीच सहज चालले जायचे.

तरुणाईच्या उत्साहाने फुलून गेलेल्या त्या रस्त्यांवरून चालताना त्यांना फार छान वाटायचे. शाळेतून परत येणारी मुले,त्यांची मस्ती, कॉलेज मधील तरुण तरुणींचे घोळके, त्यांच्या प्रफुल्लित चर्चा, हास्याची कारंजी हे सगळे बघताना ते देखील आपल्या जुन्या दिवसात जायचे आणि प्रफुल्लित होऊन जायचे. गेले अनेक दिवस त्यांचा हा क्रम अव्याहत चालला होता. 

त्यादिवशी असेच ते संध्याकाळी निघाले होते. टिळक रस्त्यावरील एका बस थांब्याजवळ त्यांना एक तरुणी दिसली. कॉलेजमध्ये जाणारी, साधारण वीस ते एकवीस वर्षे वयाची. ती दिसायला सुंदर होतीच शिवाय तिची वेशभूषा देखील अत्यंत आकर्षक होती. गोरा रंग, त्याला साजेश्या रंगाचा पंजाबी कुर्ता सलवार, व्यवस्थित बनवलेली केशभूषा. एकूणच रस्त्यावरून जाणाऱ्या कोणाचीही नजर आकर्षून घेईल असे तिचे व्यक्तिमत्व होते. अरुणरावांनी देखील तिला बघितले, एक ते दोन क्षण त्यांची नजरानजर झाली. आजकालच्या मुली अतिशय नीटनेटक्या राहतात. त्यांना स्वतःबद्दल आत्मविश्वास वाटतो. आपली मुलगी आज जर या वयाची असती तर ती देखील साधारणपणे अशीच दिसली असती असे विचार तेव्हढ्या वेळात त्यांच्या मनात तरळून गेले. ते स्वतःशीच हसले आणि पुढे निघाले.

त्यादिवशी कधी नव्हे ते त्यांनी आपला रस्ता बदलला. टिळक रस्त्यावरील एका गल्लीत ते सहज म्हणून शिरले. त्या गल्लीत कपड्यांची, खाण्याची आणि संगणकाची काही मोठी दुकाने होती. एव्हढ्यात त्यांचे लक्ष समोरील एका पाटीकडे गेले. एका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर एक पाटी झळकत होती - "अनुभवालय". अश्या नावाची कोणतीही पाटी अथवा दुकान त्यांनी यापूर्वी कधीही बघितले नव्हते.

अत्यंत कुतूहलाने ते त्या पाटीच्या शोधात त्या इमारतीत शिरले. उद्वाहकातून दुसऱ्या मजल्यावर ते पोचले. उद्वाहकाचे दार उघडताच त्यांना समोर एक मोठे दुकान दिसले. दुकान पूर्णपणे वातानुकूलित होते. समोर पादत्राणांसाठी फडताळ होते. त्या फडताळामध्ये काही पादत्राणांच्या जोड्या दिसल्या. त्या फडताळाच्या बाजूला काचेचे दार होते. बिचकतच त्यांनी दार उघडले. आणि ते आत शिरले. आत शिरताच त्यांना दिसले कि ते एका मोठ्या खोलीत आहेत. त्या खोलीच्या एका कोपऱ्यात एक प्रशस्त टेबलं होते ज्याच्या पलीकडे एका खुर्चीवर एक अत्यंत हसतमुख आणि उमद्या व्यक्तिमत्वाचा एक तरुण बसला होता. त्याने स्मितहास्य करत अरुणरावांचे स्वागत केले आणि त्यांना आपल्या समोरील खुर्चीवर बसण्याची विनंती केली. 

अरुणरावांनी मग त्या तरुणाला त्या दुकानाची माहिती विचारली. तो तरुण म्हणाला मी विक्रांत, मी अमेरिकेतील विश्वविद्यालयातून संगणक शास्त्राची पदव्युत्तर पदवी घेतली आणि मानसशास्त्रातील संगणकाचा उपयोग यावरील प्रबंध पूर्ण केला. अमेरिकेतील वास्तव्यात मी माणसाच्या मनातील भावना टिपणारी आणि त्यांचे अनुभव संगणकावर नोंदवून ठेवणारी एक संगणकीय प्रणाली विकसित केली. ह्या प्रणाली द्वारे कोणताही मनुष्य इतर कोणत्याही मनुष्याला आलेले अनुभव स्वतः अनुभवू शकतो. त्यासाठी मी एक विशिष्ठ दृक्श्राव्य प्रणाली देखील विकसित केली आहे. ज्या  मनुष्याला काही अनुभव घ्यायचा असेल त्याने आमच्या संगणक प्रणालीतील उपलब्ध असणाऱ्या सूचीमधून आपल्याला हवा तो अनुभव निवडायचा आणि मग तो अनुभवायचा. आमच्याकडील अनुभवांच्या प्रकारामध्ये प्रथमच परदेशात जाण्याचा अनुभव, रोमांचक खेळांचे अनुभव असे अनेक प्रकार आहेत. आमची संगणक प्रणाली अश्या पद्धतीने बनवली आहे कि अनुभव घेणारा तो अनुभव प्रत्यक्ष जगतो. हे सगळं ऐकून अरुणराव अत्यंत चकित झाले. त्यांनी बघितले कि बाजूच्या खोलीत काही छोटी दालने होती. प्रत्येक दालनामध्ये एक मोठ्या खुर्चीवर एक मनुष्य बसला होता, त्याच्या डोक्यावर हेल्मेट सारखे काहीतरी घातले होते. खुर्चीच्या हातावर काही हिरव्या, लाल, पिवळ्या रंगांच्या कळा होत्या. विक्रांतने त्यांना सांगितले कि हे सर्व लोक अनुभवालयाचे सभासद आहेत आणि नियमित वेगवेगळे अनुभव घेण्यासाठी ते येथे येतात. 

अरुणरावांनी दुसऱ्याच दिवशी त्या अनुभवलायची सदस्यता घेतली आणि आपला पहिला अनुभव अनुभवण्यासाठी ते सज्ज झाले. विक्रांतने त्यांना आतील दालनात नेले. त्यांना एका संगणकासमोर एका अत्याधुनिक हलत्या खुर्चीवर बसवण्यात आले. एक हेल्मेट सारखे दिसणारे यंत्र त्यांना डोक्यावर घालण्यात आले. अरुणरावांनी एक हिरवी  कळ दाबली त्याबरोबर त्यांच्या डोळ्यांसमोर तिथे उपलब्ध असलेल्या अनुभवांची सूची प्रकट झाली. त्यांनी कधीही विमान प्रवास वा परदेश प्रवास केला नव्हता म्हणून त्यांनी परदेशगमनाची सूची निवडली. त्याबरोबर त्यांच्यासमोर शेकडो अनुभवांची उपसूची प्रकटली. आता त्यांनी एक अनुभव निवडला आणि हिरवी कळ पुन्हा दाबली.  पुढच्या क्षणी त्यांना जाणवले कि ते अमेरिकेला जाणाऱ्या विमानात बसलेले आहेत आणि खरोखरच ते तो अनुभव जगू लागले. तो आंतरराष्ट्रीय विमानतळ, ते अवाढव्य विमान, त्यातील हवाई सुंदऱ्या, त्यांचे आदरातिथ्य, विमान उड्डाण करतांना पोटात येणारा गोळा, कानाला बसलेले दडे, विमानातील सहप्रवासी, सुरुवातीला हवाहवासा आणि नंतर मात्र कंटाळवाणा झालेला विमानप्रवास, विमानाचे उड्डाण आणि खाली उतरणे, विमान खाली उतरल्यानंतरचे सगळे सोपस्कार हे सगळे सगळे त्यांनी खरोखर अनुभवले. अरुणराव प्रचंड रोमांचित होऊन दालनाबाहेर आले. अनुभवालय खरेच काम करत होते. त्यानंतर मात्र अरुणरावांना अनुभवलायची चटकच लागली. अनेक दिवस ते नियमित अनुभवालयात जात होते आणि नवनवे अनुभव घेत होते.

एक दिवस ते नेहमीप्रमाणेच अनुभवालयात आले. त्या दिवशी मात्र त्यांनी एक वेगळीच सूची निवडली "पुरुषी नजर". त्यांनी उत्सुकतेने त्यातील मोट्ठी उपसूची उघडली आणि हिरवी कळ दाबली. पहिला अनुभव मुंबईतील एका नोकरदार महिलेचा होता. उपनगरीय रेल्वे प्रवास करताना आलेला एक अनुभव तिने नोंदवला होता. त्यापुढचा अनुभव एका मध्यमवयीन महिलेला पुण्यात पी एम टी मध्ये प्रवास करतं आलेला होता. अरुणरावांनी आज प्रथमच एका स्त्रीच्या बाजूकडून पुरुषी नजरेचा अनुभव घेतला होता. तो अनुभव स्वतः घेतल्यामुळे ते खूप अस्वस्थ झाले. आता त्यांनी पुढचा अनुभव निवडला आणि ते हा नवा अनुभव घ्यायला तयार झाले. ती साधारण वीस ते एकवीस वर्षांची तरुणी होती आणि कॉलेज आटोपून टिळक रस्त्यावरील एका बस थांब्यावर उभी होती. काही वेळ गेला आणि अचानक एक नजर, एका साठीच्या पुरुषाची नजर तिच्या अंगावरून फिरली, गिळगिळीत, ओंगळवाणी, किळसवाणी नजर. आपल्या वडिलांच्या वयाच्या माणसांचे असे अनुभव तिला याआधीही आले होते आणि हा देखील तोच अनुभव. त्यानंतर हसून तो माणूस तिथून चालला गेला परंतु त्याची ती नजर मात्र शरीरावर चिटकूनच होती.  

अरुणरावांना प्रचंड धक्का बसला होता. कारण हो तेच बिलकुल तेच समोरच्या रस्त्यावरून तिच्याकडे बघत होते. त्यांचा असा अनुभव त्या तरुणीने नोंदवून ठेवला होता. आपल्याबद्दलचा अनुभव अश्या प्रकारे त्या मुलीच्या मनात अत्यंत चुकीच्या पद्धतीने नोंदवला गेल्यामुळे ते हतबुद्ध झाले आणि एक पुरुषी नजर एका स्त्रीच्या नजरेतून वाचून ते निशब्द झाले.

या  लेखातील शब्दांकन कॉपीराईट (© कौस्तुभ प्रकाश भागवत)  आहे.

All Rights Reserved, 2020 © कौस्तुभ प्रकाश भागवत