Sunday, February 16, 2020

माझे आजोळ


आजोळचे कौतुक नसेल असा मनुष्य सापडणे कठीणच आहे. विशेषतः लहान मुलांचे आणि आजी आजोबांचे नाते हे अत्यंत वेगळे असे नाते आहे. ही नाती खरेतर शब्दातून मांडणं अवघड आहे. परंतु तरीही लिहिण्याची इच्छा झाली म्हणून हे धाडस करून बघतो आहे.

माझे आजोळ अमरावतीचे. अमरावतीच्या राजापेठ चौकात बडनेरा रोड वर माझ्या आजी आजोबांचे घर होते. हे घर मुंबई कलकत्ता हायवे ह्या अत्यंत रहदारीच्या रस्त्यावर होते. आजोबांचे घर हे पहिल्या मजल्यावर होते आणि खालती बरीच दुकाने होती. घराला समोरची आणि मागची अश्या दोन गच्या होत्या. मागची गच्ची बरीच मोठी होती. ह्या गच्चीमध्ये वापरण्याच्या पाण्याकरिता एक मोठे टाके बांधले होते. कॉरपोरेशनचा नळ खाली होता. ह्या नळाचे पाणी वरच्या टाक्यात चढवण्यासाठी टिल्लू पंप लावण्याची सोय केली होती. आम्ही आजोळी गेल्यावर हे पाणी चढवणे हे माझ्या व माझ्या मोठ्या बहिणीसाठी एक महत्वाचे काम असे. कॉरपोरेशनच्या नळाच्या खाली एक मोठी बादली मावेल एव्हढे टाके होते. त्यात ती बादली ठेवायची आणि बादली भरली कि टिल्लू पंपाचा पाईप त्यात सोडायचा आणि पाणी चढवणे सुरु करायचे. बादलीतले पाणी संपत आले कि पंप बंद करायचा. कधीतरी बादलीतले पाणी प्रमाणापेक्षा कमी झाले तर त्या पाइपमध्ये हवा शिरायची आणि मग ती हवा काढणे हि एक निराळीच कसरत होऊन जायची. अमरावतीला पाण्याचे तसे दुर्भिक्ष. त्यामुळे नळाच्या पाण्याला फार जोर नसे. त्यामुळे हे पाणी चढवण्याचे काम साधारण एक दिड तास चालायचे. वरचे टाके पाण्याने पूर्ण भरले म्हणजे आजोबा निरोप पाठवायचे कि आता पुरे. मी तर प्राण कंठाशी आणून ह्या निरोपाची वाट बघत असे.

माझे आजोबा कै. एकनाथ नारायण भागवत हे शिक्षक होते आणि ते डीएड कॉलेजला शिकवत असत. रिटायर झाल्यानंतर ते घरी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र अणि गणित ह्या विषयांच्या शिकवण्या घेत. माझे आजोबा हे अत्यंत प्रेमळ होते. आम्ही आजोबांच्या घरी आलो कि त्याच दिवशी ते मला व माझ्या बहिणीला शुद्धलेखनाची वही आणि पेन घेऊन द्यायचे आणि मला व बहिणीला दररोज प्रत्येकी दहा ओळी शुद्धलेखन लिहायला सांगायचे. मला ह्या गोष्टीचा अत्यंत कंटाळा येत असे. मग मी पेपरात छापून येणाऱ्या कॉमिक स्ट्रीप मधून पाच ते दहा वाक्य कशीबशी लिहीत असे. माझी बहीण मात्र नेमाने शुद्धलेखन लिहीत असे. माझा शुद्धलेखनातला कंटाळा बघून ते मला रागावत असत परंतु माझी सवय काही बदलली नाही. लहानपणी आजोबांच्या ह्या कृतीचे महत्व मला कधीच लक्षात आले नाही आणि त्याचे दुष्परिणाम मी नंतर माझे संपूर्ण शिक्षण पूर्ण होईपर्यंत भोगले. माझ्या वडिलांचे हस्ताक्षर अत्यंत नीटनेटके आणि सुवाच्य होते. पण मी मात्र ह्या बाबतीत माझ्या वडिलांचा कित्ता गिरवू शकलो नाही. माझे स्वतःचे अक्षर मलाच वाचता येईल कि नाही एव्हढे खराब असे. त्यामुळे माझ्या परीक्षांमध्ये बराच अभ्यास करून सुद्धा मला तुलनेने कमी मार्क्स मिळायचे.

आम्ही आजोबांकडे गेलो म्हणजे ते आम्हाला रोज रात्री गोष्टी सांगत असत. रात्री गाद्या घातल्या कि मग पलंगावर आजोबा झोपायचे. मग त्यांच्या एका हातावर मी आणि दुसऱ्या हातावर माझी बहीण असे आम्ही डोके ठेवून झोपायचो आणि त्यांचे गोष्ट सांगणे सुरु व्हायचे. गोष्ट सांगताना त्यांचे डोके हे वर छताकडेच हवे ह्याबद्दल आम्ही फार जागरूक राहायचो. बोलता बोलता चुकून जर त्यांनी माझ्याकडे वळून पुढचे बोलायला सुरुवात केली कि माझी बहीण ओरडायला लागायची कि आजोबा तुम्ही फक्त त्याला गोष्ट सांगताय. हेच जर बोलता बोलता ते तिच्या कडे वळले तर मी ओरडायचो. त्यामुळे आमची भांडणे न होऊ देता गोष्ट सांगण्याची कसरत त्यांना करावी लागायची.

माझ्या आजोबांच्या काही खास लकबी होत्या. त्यांच्यासमोर एखादे मूल तोंडात बोट घालताना दिसले म्हणजे ते "तोंडात बोट" असे एक वाक्य म्हणत असत आणि ती सवय सोडवण्याचा प्रयत्न करत असत. कधीतरी आजोबा चालताना आपले हात आपल्या पायांवर विशिष्ठ क्रमाने थाप मारून चालत असत आणि त्याचा एक विशिष्ट ठेका निर्माण होई. तो ठेका मला आवडत असल्यामुळे मी देखील त्याप्रमाणे चालण्याचा प्रयत्न करून पाहत असे.

आजोबांच्या घरी एक छोटी कोठीची खोली होती. त्या खोलीमध्ये एका पोत्यात आजोबा जुनी पत्रे ठेवत असत. हे पोते म्हणजे आम्हा मुलांसाठी खेळण्याचे एक वेगळेच साधन झाले होते. त्या पोत्यात हात घातला म्हणजे आमच्या हाताला कधी एखादे जुने पत्र, कधी जुने पुस्तक, कधी पेन अश्या वस्तू सापडत असत. घरामध्ये भिंतीत फडताळात असलेली आणि बाहेरून लाकडी दार असणारी दोन कपाट होती. त्यापैकी एक मेन हॉल मध्ये तर दुसरे किचन मध्ये होते. मेन हॉल मधील कपाटाला आजोबांचे आणि किचन मधील कपाटाला आजीचे कपाट अशी आम्ही नावे दिली होती.

आजोबांचे कपाट उघडले म्हणजे त्यात आम्हाला हार्डवेअरच्या वस्तू, अनेक जुनी मासिके, ऑडिओ कॅस्सेट्स, तांब्याच्या, इलेकट्रीकच्या वस्तू असे काय काय सामान सापडायचे. ह्या वस्तू उचकटून त्यांच्याशी पण आमचे खेळणे चाले. आमच्या ह्या उपद्व्यापातला एक गमतीशीर प्रकार म्हणजे मी कधी कधी वाटीभर पाण्यात मिळेल तो पदार्थ टाकून जसे कि राखुंडी, तोंडाला लावायची पावडर त्यापासून काहीतरी नवीन प्रकार बनेल अशी अपेक्षा करायचो. आजोबा बऱ्याचदा आम्हाला सायन्स चे काही प्रयोग करून दाखवीत. ह्यामध्ये कंगवा केसांमध्ये फिरवून त्याला कागदाचे तुकडे कसे चिकटतात ते दाखवणे (स्थितिज ऊर्जा), एका भांड्यात पाणी भरून, मेणबत्ती लावून त्यावर ग्लास उपडा ठेवणे आणि मेणबत्तीचे विझणे आणि त्याप्रमाणात पाणी ग्लास मध्ये वरती चढणे(ऑक्सिजनचा प्रयोग), भिंगाद्वारे सूर्यप्रकाशात एखादा कागदाचा कपटा पेटवणे, साखर पाण्यात विरघळवून ते पाणी बशीत काढून आणि उन्हात ठेवून त्यापासून पुन्हा साखर मिळवणे असे प्रयोग असायचे.

आम्ही अमरावतीला आलो म्हणजे आमचे अजून दोन ठरलेले कार्यक्रम असत. एक म्हणजे अमरावती बडनेरा प्यासेंजरची ट्रीप आणि दुसरा म्हणजे मालटेकडीवरची चक्कर. आजोबा आम्हाला घेऊन अमरावती - बडनेरा - अमरावती असे परतीचे तिकीट काढत. आजोबांसोबतची ही सहलपण आमच्यासाठी आनंदाची एक पर्वणीच असायची. ट्रेनमध्ये आजोबा आम्हाला अनेक गोष्टी सांगायचे. मालटेकडी म्हणजे संध्याकाळी फिरायला जाण्याची जागा. फारशी उंच नसेल परंतु वर चढेपर्यंत आम्हाला चांगलीच धाप लागायची. तिथून परत घरी येईपर्यंत आजीने स्वयंपाक केलेला असे. मग त्या दोघांसोबत गप्पा मारत गरम भाकरी, पोळी खात आमचे जेवण चालायचे.

आम्हाला गुंतवून ठेवण्यासाठी आजोबांनी एक खेळ शोधून काढला होता. ते मला आणि ताईला गॅलरीत बसवीत. आम्हाला एक एक पेन आणि कागद देत आणि पुढच्या एक ते दीड तासात घरासमोरच्या रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांची जसे बस, ट्रक, कार, ऑटो, सायकल, सायकलरीक्षा ह्यांची नोंद करायला सांगत. आम्हीदेखील ह्या नोंदी घेऊन खूप उत्साहाने त्यांना त्या दाखवीत असू.

आजोबांच्या झोपायच्या खोलीत एका भिंतीवर पुस्तकांचे एक मोठे कपाट होते. त्यात लहान मुलांच्या गोष्टींपासून तर ऐतिहासिक, वैज्ञानिक अशा पुस्तकांचा साठा होता. आजोबांचा पुस्तक संग्रह प्रचंड होता. साहजिकच त्यामुळे आम्हालापण वाचनाची गोडी निर्माण झाली. याच खोलीत लोखंडाचे फोल्डिंगचे दोन पलंग होते. दुपारी मी आणि माझा चुलत भाऊ आम्ही त्या पलंगाचा बस म्हणून वापर करायचो. स्टीलची मोठी पातेली किंवा जेवण्याचे ताट म्हणजे आमचे स्टिअरिंग व्हील. इंजिनाचा आवाज आम्ही तोंडाने काढायचो. दुपारी किती तरी वेळ आम्ही तोंडाने घ्यांग, घ्यांग, घ्यांग आणि पीप पीप असा मोठ्याने आवाज काढत खेळात असू. दुपारी आजी आजोबांच्या झोपण्याच्या वेळेत आमच्या अश्या खेळण्याचा त्यांना किती त्रास होत असेल ह्याची मी आता कल्पनापण करू शकत नाही. तरीपण ते दोघे कधीही आम्हाला कधीही ओरडले नाहीत.


उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये आम्ही दोघे आणि आमची आतेभावंडं अमरावतीला जमायचो. मला आठवणारी एक गम्मत म्हणजे आमची नाटकं. उन्हाळ्यामध्ये झोपायचे पलंग आमच्या मोठ्या गच्चीत असायचे आणि रात्री आम्ही बाहेरच झोपत असू. ह्या पलंगांना मच्छरदाणी लावण्यासाठी म्हणून चार बाजूनी लोखंडी बार केले होते. हे पलंग म्हणजे आमचा रंगमंच. मच्छरदाणीच्या जागी चादरी टाकून आम्ही रंगमंचाचे पडदे करत असू.

रात्री गच्चीमध्ये झोपण्यात पण वेगळीच गंमत असायची. आम्ही साधारण रात्री ८ च्या सुमारास गाद्या गच्चीत घालून ठेवायचो. झोपण्याच्या वेळेपर्यंत गाद्या एक्दम गार होऊन जायच्या.मग रात्री गादीवर पडल्या पडल्या आकाशातील सप्तर्षी, ध्रुव तारा वगैरे तारे बघत, गप्पा मारता मारता झोपायचो. सकाळी सहा वाजताच लक्ख उजाडले असायचे. त्यामुळे कितीपण प्रयत्न केला तरीही उशिरापर्यंत झोपता येत नसे.

हिवाळ्याच्या सुमारास आम्ही कधी आजोळी असलो म्हणजे बंबाच्या पाण्याने आंघोळ करण्याची मजा यायची. गच्चीत पाणी तापवण्याचा तांब्याचा बंब होता. त्याच्यामध्ये आतमधल्या बाजूने लाकडाच्या झिलप्या टाकत आणि बाहेरच्या बाजूने पाणी ओतत. आजोबा बंब पेटवत असत. थोड्याच वेळात मस्त कढत पाणी मिळे. त्या पाण्याची मजा आजच्या गिझरच्या पाण्याला पण नाही. बंबामधले तापलेले पाणी काढल्यानंतर बंब बराच रिकामा होई. मग त्यात पुन्हा गार पाणी ओतावे लागे. बंब संपूर्ण तांब्याचा असल्याने खूप तापलेला असे आणि आतली लोखंडी झिलप्या टाकण्याची नळी पण प्रचंड तापलेली असे. त्यामुळे नवीन गार पाणी ओतताना एकदम खूप वाफा निघत आणि पाण्याचा झस झस असा आवाज होत असे. त्या आवाजाचीपण एक वेगळीच मजा होती.

या  लेखातील शब्दांकन कॉपीराईट (© कौस्तुभ प्रकाश भागवत)  आहे.

All Rights Reserved, 2020 © कौस्तुभ प्रकाश भागवत  

No comments:

Post a Comment