Friday, June 26, 2020

माझी मदत करणार ना ?

आजकाल मी मराठी मालिका बघणे बंद केले आहे. त्याला कारणच तसे आहे. म्हणजे कुठलीही पण मालिका असेल तरी मी कानाला खडा लावलाय कि बघायची नाही म्हणजे नाही. आता हे सगळे मी तुम्हाला का सांगतो आहे. कारण मला तुमची मदत हवी आहे. मी पूर्वी खूप मालिका बघायचो. त्यातले छान छान हिरो, त्यांच्या छान छान बायका, त्यांची इतर लफडी, घरातल्या कुलंगडी, डावपेच, प्रति डावपेच, त्यांचे जय पराजय हे सगळे बघताना मी अगदी गुंग होऊन जायचो. मला नेहमी वाटायचे कि मी अगदी त्या मालिकेच्या नायकांसारखे दिसावे आणि त्यांच्यासारखे खऱ्या आयुष्यात जगावे. म्हणून मी सदैव बैचैन असायचो. मला त्या हिरो सारखे जगता यावे म्हणून मी खूप विचार करायचो पण काही समजायचे नाही. एके दिवशी विचार करून माझे डोके शिणल्यावर, मी बाहेर पडलोमी माझ्या बाईकवरून लोणावळ्याच्या बाजूला फिरायला गेलो. नुकताच पाऊस पडून गेला होता. मस्त गार वर सुटला होता, सगळीकडे हिरवळ दाटून आली होती. बराच वेळ गाडी चालवल्यानंतर मी एका माळरानापाशी गाडी उभी केली आणि त्या माळरानावर फिरून यावे म्हणून गाडी वरून उतरलो. त्या ठिकाणी बरीच झाडी दाटली होती आणि त्यातून मी मार्ग काढत चाललो होतो. एका ठिकाणी माझा पाय अडखळला आणि मी खाली पडलो. स्वतःला सावरत मी उभा राहिलो तेव्हढ्यात मला एका बाजूच्या दाट झुडुपामध्ये एक जुना पितळी दिवा दिसला.

मी तो दिवा तिथून बाहेर काढला. तो दिवा मी लहानपणी गोष्टीत वाचलेल्या आणि चित्रात पाहिलेल्या जादूच्या दिव्यासारखा दिसत होता. अर्थात तो गोष्टीतला दिवा होता आणि हा खराखुरा दिवा होता. त्यामुळे ह्यात तो जीन नसणारच हे गोष्ट तर नक्कीच होती. पण काय सांगता, कदाचित माझ्या हाती खरोखरीच तो दिवा लागला असेल तर ?

मी इतका अचंभित झालो होतो कि मी तो दिवा तातडीने माझ्या हाताच्या तळव्याने घासून बघितला. तेव्हढ्यात त्या दिव्यातून धूर बाहेर पडायला लागला. हळूहळू धूर वाढायला लागला. त्या धुराचा एक ढगच माझ्यापुढे तयार झाला. त्या ढगातून गडगडाट व्हायला लागला. आता हळू हळू तो धूर ओसरायला लागला आणि जसा तो धूर ओसरायला लागला, मला त्याच्यातून एक धिप्पाड काळी कभिन्न आकृती दिसायला लागली. मला जाणवलेला गडगडाट म्हणजे त्या आकृतीचे हसणे होते. तो धूर पूर्ण ओसरल्यावर मला त्या आकृतीचे पूर्ण दर्शन झाले. साधारण सात फूट उंच, मजबूत बांध्याचा, रुंद कपाळ असलेला असा तो जीन माझ्या समोर हात जोडून उभा होता.

मला बघताच त्याने मला कंबरेपर्यंत लवून नमस्कार केला आणि म्हणाला "माझे आका मी तुमचा गुलाम आहे. माझ्यासाठी काय आज्ञा आहे. तुम्ही कुठलीही इच्छा सांगा, मी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करीन." आता मात्र मी भोवळ येऊन खाली पडायचाच बाकी होतो. मी स्वतःला चिमटे काढून बघितले. चिमटे काढून काढून माझी त्वचा हुळहुळी होऊन गेली होती. पण निःसंशय तो जीन माझ्या समोरच होता.

मला थोडा सावरलेला बघितल्यानंतर तो पुढे बोलायला लागला. तो म्हणाला कि तो एका वेळेस माझी एकच इच्छा पूर्ण करेल. मी एक इच्छा व्यक्त केल्यानंतर जो पर्यंत ती पूर्ण होणार नाही तो पर्यंत मला त्याला दुसरे काहीही मागता येणार नाही. माझी इच्छा पूर्ण होण्यासाठी मला तो दिव्यातून बाहेर यायची वाट बघावी लागेल. तोपर्यंत मला दिवा घासून त्याला पुन्हा बाहेर बोलावता येणार नाही.  मग त्याने मला विचारले कि माझी कुठली इच्छा सर्वात आधी पूर्ण करायची आहे. मी त्याला बोललो की मला मालिकांमधल्या हिरो सारखे श्रीमंत आणि विलासी जीवन खऱ्या आयुष्यात जगायचे आहे. माझी इच्छा ऐकताच तो खो-खो हसू लागला आणि म्हणाला बस एव्हढीशी गोष्ट. ठीक आहे. मी तुमची ही इच्छा पूर्ण करीन. पण गेली शेकडो वर्ष मी ह्या दिव्यात बंदिस्त असल्यामुळे मला मालिकांबद्दल काहीच माहित नाही. त्यामुळे त्याला मी थोडा अवधी द्यावा आणि तेव्हढ्या अवधीत तो त्या मालिका बघून मला काय हवे आहे ते देऊ शकेल. मी खूपच खुश झालो होतो आणि मी त्याच्या म्हणण्याला होकार दिला. हा जीन फार तर आठवडाभरात मला काय हवे हे ओळखेल आणि मग माझी इच्छा पूर्ण करेल अशी मला खात्री होती. त्यामुळे मी तर बेहद्द खुश होतो.

तो जीन आपल्या दिव्यात परत गेला. मी दिवा आपल्या बॅग मध्ये ठेवला आणि गाडीवरून घरी आलो. दुसऱ्या दिवसापासून मी रोज त्या दिव्याजवळ जायचो आणि तो जीन कधी बाहेर येईल याची वाट बघायचो.
आठवडा झाला, महिना झाला, दोन महिने झाले, तीन महिने झाले पण जीन काही बाहेर यायचे नाव घेईना. आता मात्र माझी बैचैनी वाढू लागली. जवळपास सहा महिने उलटून गेले. जीन आता दिव्यातून बाहेर येईल अशी आशा मला वाटेनाशी झाली. एका संध्याकाळी मी असाच दिव्याजवळ बसलो असताना दिव्यातून धूर बाहेर यायला लागला. धूर हळूहळू वाढायला लागला आणि तो जीन माझ्यापुढे प्रकट झाला.

परंतु आज मात्र तो हसत नव्हता. त्याचा चेहरा पडलेला होता. डोळे निस्तेज झाले होते. खांदे खाली झुकलेले होते. खोल गेलेल्या आवाजात तो मला म्हणाला की गेले सहा महिने तो मालिका बघतो आहे. त्याने बऱ्याच मराठी मालिका बघितल्या. त्यामुळे मालिकांमधले हिरो कसे असतात आता त्याला कळले आहे. तो पुढे मला म्हणाला:

) माझे आका, लग्नासाठी नावनोंदणी करून साधारणपणे तीन वर्ष मुली बघितल्यानंतर, तुम्ही संपर्क केलेल्या साधारण ३५० मुलींनी तुमचा फोटो बघूनच तुम्हाला नाही म्हंटले तर जवळपास ७५ मुलींनी तुम्हाला भेटल्यानंतर नाही म्हंटले. तुम्हाला फक्त मुलींनी स्वतःहून संपर्क केला आणि त्यांनी पण तुम्हाला नाही म्हंटले. त्यामुळे तुमच्या एकूण व्यक्तिमत्वाची तुम्हाला कल्पना असेलच अशी मला आशा वाटते. त्याच्यामुळे तुम्हाला जर हिरो सारखे दिसायचे असेल तर मला तुमचे पूर्ण व्यक्तिमत्वच बदलावे लागेल. साधारण दोनेक वर्ष व्यायामशाळेत जाऊन कसून मेहनत केल्यानंतर आणि त्याला योग्य असा आहार घेतल्यानंतर तुमची तब्बेत बनेल. तुम्हाला हा व्यायाम आयुष्यभर करावा लागेल आणि त्याला लागणारा आहारपण नेहमीसाठी घ्यावा लागेल. त्याचा वर्षाचा खर्च काही लाखांवर आहे.

) आजपर्यंत कुठल्याही मुलीने तुम्हाला दारात सुद्धा उभे केलेले नाही. त्यामुळे तुम्हाला गर्लफ्रेंडच काय तर हाफ गर्लफ्रेंडपण कधीही मिळालेली नाही. अहो, लग्नाला बायको मिळायलाच तुम्हाला एव्हढा प्रयत्न करावा लागतोय. मग त्यातून गर्लफ्रेंड मिळवायची तर मग तिच्यासाठी सारखे महागड्या हॉटेलमध्ये जाणे, ब्रँडेड कपडे विकत घेणे, तिला प्रत्येक महिन्यात फिरायला पुण्याबाहेर घेऊन जाणे, तिला सतत महागडी गिफ्ट्स देणे, हे सगळे करणे तुम्हाला भाग आले. त्यापायी महिन्याकाठी काही हजारांचा खर्च सहज करावा लागेल.

) लग्नाव्यतिरिक्त काही भानगड करायची म्हणजे तेव्हढा वेळ आणि पैसा पण पाहिजे. मी बघितलेल्या सगळ्या मालिकांमधले हिरो हे कुठल्याश्या कंपनीत खूप वरिष्ठ पदावर होते. तुमच्या कंपनीत तुम्ही फक्त एक वरिष्ठ अभियंता आहात. तरीदेखील रोज तुम्हाला ऑफिसमध्ये दहा ते बारा तास काम करावे लागते. कधी सुटीच्या दिवशीदेखील तुम्हाला ऑफिसमध्ये जावे लागते. तुम्हाला स्वतःसाठी सुद्धा पुरेसा वेळ मिळत नाही. तुम्ही अजून वरच्या पदावर गेलात म्हणजे तुम्हाला मिळणार वेळ अजून कमी होईल. त्यामुळे जर तुम्हाला मालिकांमधल्या हिरोंप्रमाणे वरिष्ठ पदावर काम करून बायकोला आणि भानगडी करायला वेळ द्यायचा झाला म्हणजे ती कंपनी एक तर तुमच्या घरची तरी पाहिजे किंवा त्या कंपनीचे प्रशासन एव्हढे बावळट तरी हवे कि तुम्हाला ते फुकटचा पगार देऊ शकतील. बरे आणि तुम्ही तुमच्या कंपनीत काहीही काम करतादेखील तुमची कंपनी तिच्या क्षेत्रात आघाडीवर असली पाहिजे. हे सगळे करण्यासाठी महिन्याला साधारण काही कोटी रुपये तरी लागतील.

) मी बघितलेली अजून एक गोष्ट म्हणजे त्या मालिकांमधल्या हिरोंचे शेजारी हे अतिशय मदतगार असतात. त्यांना आपल्या घरातल्या कुठल्याच समस्या नसतात आणि सदैव ती लोक त्या हिरोच्या समस्यांमध्ये नाक खुपसत असतात. त्यांच्या रोजच्या चर्चा म्हणजे त्या हिरोच्या आयुष्यातल्या समस्या कश्या सोडवायच्या ह्यावर असतात. आजकालच्या जगात जिथे शेजारी कोण राहतंय हे देखील माहित नसते तिथे एव्हढ्या चांगल्या शेजाऱ्यांची सोय करायची, त्यांना आपल्या समस्या सोडून दुसऱ्याच्या समस्या सोडवायला वेळ मिळण्याची व्यवस्था करायची म्हणजे त्यांना आयुष्यात काहीच त्रास होणार नाही ह्याची व्यवस्थापण करावी लागेल. ह्याचाच अर्थ म्हणजे मला त्यांच्या अर्थार्जनाचीदेखील सोया करावी लागेल. ह्यासाठी पण अवाढव्य खर्च करावा लागेल.

) आता मालिकांमधल्या हिरोच्या घरात होणाऱ्या भानगडी, कुलंगडी तुमच्या घरात करायच्या म्हणजे तुमच्या नातेवाईकांना पण एव्हढा वेळ मिळायला हवा कि संबंध दिवस त्यांनी फक्त तुम्हाला अडचणीत कसे आणता येईल ह्याचाच विचार करण्यात घालवावा. त्यांनी आपली घर, मुलं, संसार, आपली ध्येय,आपली नोकरी सर्व सोडून पूर्ण वेळ नव्या नव्या भानगडी उकरून काढायच्या म्हणजे त्यांच्या आयुष्याची पूर्ण तजवीज करावी लागेल. त्यालादेखील महिन्याला प्रचंड पैसा लागेल.

म्हणजे माझ्या एकूण हिशोबानुसार, तुम्हाला हिरोसारखे आयुष्य जर जगायचे असेल तर त्याला वार्षिक खर्च हा साधारणपणे कित्येक कोटींचा होईल. पुन्हा चलनवाढ जर आपण ह्यात धरली तर वर्षाला साधारण टक्के कमीत कमी असा हा खर्च वाढत जाईल. आता हा पैश्यांचा सगळा बंदोबस्त करायचा झाला म्हणजे आजच्या घटकेला साधारण काही हजार कोटींचे अंदाजपत्रक तयार करावे लागेल आणि तेव्हढा पैसा उभा करण्याचा कुठलाही मार्ग मला अजून सापडला नाही.

मी म्हंटल्याप्रमाणे मी एकावेळेस एक इच्छा पूर्ण करू शकतो. परंतु तुमची हि एक इच्छा पूर्ण करताना ह्यात बाकीच्या अनेक मागण्यांचा पण समावेश आहे, हे मला आत्ता लक्षात आले आहे.आमच्या जीन लोकांच्या राज्यात पण काही नियमावली आहेत. त्यातील नियम आम्ही मोडल्यास आम्हाला भयंकर शिक्षा होते. त्यातील नियम १५ नुसार, आम्हाला ज्या गोष्टीची पूर्ण माहिती नाही अशा गोष्टीविषयी आमच्या मालकाने व्यक्त केलेली इच्छा आम्हाला पूर्ण करण्याचा अधिकार आहे. परंतु जर आम्ही तरीदेखील मालकाची इच्छा पूर्ण करण्यास होकार दिला तर त्याची संपूर्ण जबाबदारी हि आमची असते.

तसेच नियम २७ नुसार, कोणत्याही मालकाची इच्छा आम्ही जर पूर्ण करू शकलो नाही तर आमच्याकडून आमची शक्ती काढून घेतली जाते. परंतु त्यातील उपनियम ३२- नुसार, जर नियम मोडणाऱ्या जीन शिवाय दुसऱ्या एखाद्या जीन ह्याने आमच्या राजाला असे सिद्ध केले कि आमच्या मालकाची इच्छा पूर्ण करणे हि अशक्य कोटीतली बाब आहे तर मात्र आम्हाला आमची शक्ती परत मिळते.

तुम्ही व्यक्त केलेल्या इच्छेला मी हो म्हंटले. मला मालिकांविषयी काहीही माहित नसताना हो म्हंटले. आणि इथेच मी पहिला नियम मोडला आणि आता हि इच्छा पूर्ण करणे अशक्य आहे असे मला लक्षात आले आहे. मी तुमची इच्छा पूर्ण करू शकणार नाही, त्यामुळे माझी शक्ती आता जाणार आणि असे म्हणून त्याच क्षणी तो जीन त्या दिव्यासकट अदृश्य झाला.

तर मित्रानो मागे मी जे म्हंटले कि मी काही आता मालिका पाहत  नाही ह्याचे कारण तुमच्या लक्षात आता आलेच असेल. पण माझ्यामुळे तो जीन मात्र आपल्या शक्तीला मुकला.

जर तुम्हाला कधी कुठे असाच एखादा दिवा आणि त्यातला जीन भेटला तर त्याला सांगा कि दिवा क्रमांक २३२ च्या जीन ह्याने नियम १५ आणि २७ मोडले. त्याला जर त्याची शक्ती परत मिळवून द्यायची असेल तर तुम्हाला भेटलेल्या जीन ने त्यांच्या राजाला हे सांगायचे कि खरोखर माझी इच्छा पूर्ण करणे अशक्य होते. म्हणजे  दिवा क्रमांक २३२ चा जीन पुन्हा आपली शक्ती मिळवू शकेल.


मग करणार माझी मदत ?


या  लेखातील शब्दांकन कॉपीराईट (© कौस्तुभ प्रकाश भागवत)  आहे.


All Rights Reserved, 2020 © कौस्तुभ प्रकाश भागवत. 

Sunday, May 10, 2020

कौस्तुभ फॉल पिको सेंटर



त्या वेळेस आम्ही धारणीला होतो. धारणी हे अमरावती जिल्ह्यातील एक तालुक्याचे ठिकाण आहे. मी पहिलीत  असेन. एके दिवशी मी संध्याकाळी शाळेतून घरी आल्यावर मला दिसले कि माझ्या अत्यंत आवडत्या दगडी पाटीवर पेंटच्या ब्रशने बाबा काहीतरी लिहीत आहेत आणि आई बाजूला बसून ते बघते आहे. मी जवळ जाऊन बघितले तर मला दिसले कि त्यावर पांढऱ्या रंगात लिहिले होते "कौस्तुभ फॉल पिको सेंटर". माझ्या दगडी पाटीवर माझ्या नावाची अशी पाटी बघून मी खूप चिडलो होतो. तर ताईने हसून हसून मला चिडवायला सुरुवात केली होती. माझी पाटी आई बाबांनी मला विचारता वापरली म्हणून तर मला राग आलाच होता पण त्यापेक्षा जास्त राग माझे नाव त्या पाटीवर टाकले होते ह्याचा आला होताकाही वेळाने मला समजले कि आई फॉल पिको करून देण्याचे काम करणार आहे. हि गोष्ट साधारण १९९१-१९९२ च्या सुमारासची आहे. धारणी हे जरी तालुक्याचे ठिकाण असले तरी त्यावेळेस गावाची एकूण वस्ती फक्त काही शेकड्यांमध्ये होती आणि ती पण सलग अशी नव्हती. आम्ही नागपूरला असताना आईने शिवणकामाचे शिक्षण घेतले होते. त्यानंतर घरी शिलाई मशीन पण आले होते. पण नंतर लगेचच बाबांची धारणीला बदली झाली.

माझी आणि ताईची शाळा दुपारची असे. त्यामुळे सकाळी बाबा ऑफिसला, ताई आणि मी शाळेत गेल्यानंतर आईला दुपारी वेळ असायचा. त्यावेळचा उपयोग आणि स्वतःच्या कौशल्याचा उपयोग करण्याचे तिच्या मनात आले. पिकोचे काम हे मशीनवर करता येत असे तर फॉल हाताने लावायला लागत असे. त्यामुळे पिको झटपट होई तर फॉल दोन्ही बाजूनी लावायचा असल्यामुळे बराच वेळ घेई. फॉल सुईने अत्यंत काळजीपूर्वक घालावा लागे. मांडीवर एक पाट घेऊन आई बराच वेळ फॉल लावायचे काम करीत बसे.

हळू हळू आईचे काम वाढले. खरे म्हणजे हे काम ती व्यवसाय म्हणून करत नव्हती. पण आपल्याकडे उपलब्ध असणाऱ्या वेळेचा काही सदुपयोग व्हावा ह्यासाठी करत होती. घर सांभाळूनच आपण हे काम करायचे असे तिने ठरवले होते. त्यामुळे त्या अनुशंगानेच तिने कामाच्या व्याप वाढवला. इतक्या लहान गावात असा कितीसा व्यवसाय होणार. आम्ही धारणीला जवळपास तीन वर्ष होतो. तेव्हढ्या वेळात तिने आपल्या छोट्याश्या व्यवसायातून तीन  हजार रुपयाचा नफा कमावला. ह्यातून तिने स्वतःसाठी काहीही घेतले नाही. बाबाना मात्र तिने आपल्या उत्पन्नातून टायटनचे एक छानसे घड्याळ घेतले. धारणींहून बाबांची बदली अमरावतीला झाली. ह्यावेळपर्यंत माझा आणि ताईचा अभ्यास वाढल्यामुळे आईने तिचा छोटासा व्यवसाय बंद केला. तर अशी ही माझ्या नावाच्या एका छोट्याश्या व्यवसायाची छोटीशी कथा.

आजच्या जगात उद्यमशीलतेला एव्हढं महत्व आलेलं असताना माझ्या आईने सुमारे तीस वर्षांपूर्वीच स्वतः:चे स्टार्टअप सुरु केले होतेपरंतु आपल्या घराला आणि मुलांना आपली जास्ती गरज आहे हे ओळखून तिने आपला व्यवसाय जास्ती पुढे वाढवला नाही. एव्हढ्या कष्टाने सुरु केलेला व्यवसाय तिने बंद केला. कदाचित आईने व्यवसाय सुरु ठेवला असता तर तो ती अजून मोठा करू शकली असती. कदाचित आज माझ्या नावाने सुरु झालेल्या त्या व्यवसायाचा मला खूप अभिमान वाटला असता. परंतु घरातील जबाबदारी तिला ह्यापेक्षा जास्त महत्वाची वाटली. 

लहानपणी शाळेच्या फॉर्मवर आईच्या व्यवसायाच्या जागेवर गृहिणी अशी नोंद करता मला कधी कधी वाटायचे कि ती पण जर नोकरी करणारी असती तर किती छान झाले असते. कारण गृहिणी असे लिहिण्यात मला काही चांगले वाटत नसे. परंतु जसा जसा मी अजून मोठा होत गेलो त्यावेळी लक्षात आले कि घरात नीट लक्ष देणे म्हणजे काही साधे काम नाही. मुळात जर नीट लक्षात घेतले तर व्यवस्थापनातल्या बऱ्याच संकल्पना घरात गृहिणी वापरत असतात.

उदाहरणार्थ मी काही दाखले खाली देतो आहे. ह्यापेक्षा कितीतरी अधिक असे दाखले देता येतील.

१. रिऑर्डर लेव्हल हि ऑपरेशन्स व्यवस्थापनातील संकल्पना स्वयंपाकगृहातील सामान किंवा किराणा मागण्यासाठी वापरणे, किंवा काही वेळेस काही विशिष्ट वस्तू गरज असेल त्या वेळेस अँड आवश्यक त्या प्रमाणात मागवणे जे कि ऑपरेशन्सचे व्यवस्थापनातील जस्ट इन टाइमचे तत्व आहे.

२. वर्षानुवर्षे गृहिणी स्वयंपाकघरात वरण, भाजी, पोळ्या करताना त्यांची चव, पोळ्यांचा आकार हा जवळपास रोज एकसारखा असतो म्हणजेच सिक्स सिग्मा किंवा टोटल क्वालिटी मॅनेजमेंट चे तत्व.

३. घरातील प्रत्येक वस्तू हि तिच्या ठरलेल्या जागीच ठेवणे म्हणजे लिन मॅन्युफॅक्चरिंग चे तत्व.

४. घरात येणाऱ्या पैशांचे मॅनेजमेंट ह्यामध्ये घरगुती कामांचा प्राधान्यक्रम ठरवणे आणि त्यानुसार कामे करणे म्हणजेच फायनान्शियल मॅनेजमेंट करणे.

५. घरातील प्रत्येक माणसाला त्याच्या कुवतीनुसार कामाचे वाटप करणे आणि ते काम त्याच्याकडून करवून घेणे म्हणजे मनुष्यबळ विकास व्यवस्थापन करणे.

6. उन्हाळ्याची कामे, दिवाळीची कामे, हिवाळ्यातील कामांची योजना, आखणी, प्रत्यक्ष ती कामे करणे आणि ठरलेल्या दिवशी ती पूर्ण करणे म्हणजेच प्लॅन-डू-चेक-ऍक्ट चे तत्व आणि प्रकल्प व्यवस्थापनातील सर्व सूत्रे वापरणे.

गृहिणींना हि सर्व तत्व नक्कीच माहित नसतील परंतु सर्व घर त्या लीलया सांभाळू शकतात कारण आपल्या घरावर आणि आपल्या घरातील लोकांवर त्यांचे असलेले निस्सीम प्रेम आणि त्यांच्या सुखासाठी वाटेल तेव्हढे कष्ट करण्याची त्यांची तयारी.